अखेर सत्यजीत तांबेंनी राजकीय भूमिका मांडली, फडणवीस, थोरात, पटोले…सगळंच बाहेर काढलं !
नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये विजय मिळवल्यानंतर सत्यजीत तांबे पहिल्यांदाच पत्रकार परिषदेला सामोरे गेले आणि त्यांनी मागच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींवर परखड भाष्य केलं. नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमदेवारी दिली होती, पण त्यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. सुधीर तांबे यांच्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी उमदेवारी अर्ज भरला, पण काँग्रेसचा एबी फॉर्म नसल्यामुळे सत्यजीत तांबे यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली. तांबे पिता पुत्रांनी केलेल्या या बंडामुळे काँग्रेसने त्यांचं सहा वर्षांसाठी निलंबन केलं.
अदानी समूहावर एकूण 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज; जाणून घ्या अदानीला कोणत्या बँकांनी किती कर्ज दिले !
सत्यजीत तांबेंनी मौन सोडलं
या सगळ्या वादानंतर अखेर सत्यजीत तांबे यांनी मौन सोडलं आहे. ‘ज्या वेळी मी संधी मागायचो तेव्हा मला वडील आमदार असल्याने संधी देता येणार नाही, असं सांगत होते. माझ्या वडिलांनी हा मतदारसंघ बांधला. सर्वपक्षीय संबंध चांगले होते. मी आमच्या प्रभारी एचके पाटील यांना भेटलो. संघटनेत काम करण्याची संधी मागितली. मला एचके पाटील यांनी वडिलांच्या जागेवर उभं राहायला सांगितलं, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. संताप झाला,’ असं सत्यजीत तांबे म्हणाले.
फडणवीस मोठ्या भावासारखे
‘माझ्या पुस्तक प्रकाशनाला मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह अजितदादांनाही आमंत्रित केलं होतं. तेव्हा देवेंद्रजी बोलले त्यावरून चर्चा झाली. सभागृहातदेखील दाद मिळाली. आमची भावना त्यांनी बोलून दाखवली. ते मला मोठ्या भावासारखे आहेत’, असं सूचक विधान सत्यजीत तांबे यांनी केलं.
बाळासाहेब थोरातांसोबतही चर्चा
‘त्या कार्यक्रमानंतर चर्चा सुरू झाली. एका बाजूला माझा पक्ष संघटना संधी देऊ शकत नाही तेव्हा वडिलांनी मला सांगितलं मी थांबतो तू लढ, पण वडिलांच्या जागेवर मला नको होतं. घरात आम्ही चर्चा केली तेव्हा थोरात साहेबदेखील होते. सत्यजीत निवडणूक लढेल हे ठरलं होतं,’ असा गौप्यस्फोट सत्यजीत तांबे यांनी केला.
पटोलेंवर घणाघात
‘पक्षाला आणि एचके पाटील साहेबांना आम्ही हे कळवलं. आम्ही त्यांच्या संपर्कात होतो, कारण हे तिकीट दिल्लीतून मिळतात, त्यांनी सांगितलं कोरा एबी फॉर्म पाठवला आहे. अर्ज भरण्याच्या दोन दिवस आधी 2 जानेवारीला एबी फॉर्म पक्षाकडे मागितला. त्यांनी नागपूरला बोलावलं, तिथे माझा माणूस गेला. 10 तास त्या माणसाला बसावं लागलं, तेव्हा त्याला नाना पटोले यांनी फॉर्म दिला. 11 तारखेला तो फॉर्म घेऊन पोहोचलो. बंद पाकीट फोडलं तेव्हा दोन्ही एबी फॉर्म पाठवले ते नाशिकचे नव्हते. एक औरंगाबाद आणि दुसरा नागपूर मतदारसंघाचा एबी फॉर्म आम्हाला दिला,’ असा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला आहे.
‘काँग्रेस प्रदेश कार्यायलाने असा फॉर्म का दिला? हा माझा प्रश्न आहे. आजपर्यंत हे मान्य का केलं नाही? माझा भाजपकडून लढण्याचा डाव असता तर मी त्यांना चुकीचे फॉर्म आले असं सांगितलं नसतं. त्यानंतर त्यांनी पाठवलेला फॉर्म सुधीर तांबे यांच्या नावाने दिला. आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी हे सगळं केलं गेलं. प्रदेश काँग्रेसने यावर उत्तर दिलं नाही. हे सगळं बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी करण्यात आलं,’ असा आरोपही सत्यजीत तांबे यांनी केला.
‘एचके पाटील यांनादेखील मी फोन केले, त्यांनी फोन घेतले नाही. नाना पटोले यांचा फोन बंद होता. मी नॅशनल काँग्रेसचे नाव फॉर्मवर टाकले होते, मात्र मी एबी फॉर्म न जोडल्याने तो फॉर्म अपक्षमध्ये कनव्हर्ट झाला. मला भाजपमध्ये ढकलण्याचं काम केलं गेलं. 12 तारखेला मला एचके पाटील यांचा फोन आला, त्यांना मी सगळी अडचण सांगितली. मला पाठिंबा जाहीर करा, असं मी त्यांना सांगितलं. मी महाविकासआघाडीच्या नेत्यांना भेटलो. मला पाठिंबा देण्यासाठी मी सगळ्यांना भेटलो. मला पाठिंह्यासाठी त्यांनी पत्र लिहायला लावलं. मला माफी मागायला लावली, मी माफीही मागितली,’ असं सत्यजीत तांबे यांनी सांगितलं.
‘मी एचके पाटील यांना पत्र लिहिलं आहे. मी संजय राऊत यांच्यासोबत देखील बोललो. माफी मागत असताना आम्हाला धोका दिला, फसवलं असं नाना पटोले बोलत गेले. एकीकडे केंद्रीय नेतृत्व बोलत असताना राज्य नेतृत्व डाव आखत होतं,’ अशी टीका सत्यजीत तांबे यांनी पटोले यांच्यावर केली आहे.
नमाज पडा अन् हिंदू मुलींना…, बाबा रामदेव यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान !
‘ही माझी शेवटची पत्रकार परिषद असेल, आता मला काम करायचं आहे. भाजप नेतृत्वाला पाठिंबा मागितला नसतानाही त्यांनी मला मदत केली. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसे सह सगळे लोक माझ्या सोबत होते. राजकारण निवडणुकीपुरतं असतं. हातसे हात जोडो मोहीम सुरू आहे, मात्र पेर से पेर अडकवण्याचं काम सुरू आहे, ते थांबवायला हवं. आम्हाला बदनाम केलं. मला आणि वडिलांना निलंबित केलं. शो कॉज नोटीस द्यायला हवी होती, मी उत्तर दिलं असतं. मी पक्षांतर्गत विषय असल्याने बोलत नव्हतो. मला काँग्रेसमधून ढकलण्याचं काम केलं जात आहे,’ अशी टीका सत्यजीत तांबे यांनी केली आहे.
अपक्षच राहणार
अनेक संघटनांनी मला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे मी अपक्षच राहीन, देवेंद्रजी अजितदादा, पवार साहेब सगळ्यांची मदत मी मागितली, असं सत्यजीत तांबे यांनी सांगितलं.