राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेला परवानगी देऊ नये; या संघटनेने दिलं पोलीस महासंचालकांना पत्र !
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा आणि भाषण नेहमीच चर्चेचा विषय असतो. राज ठाकरेंचं भाषण मनसे कार्यकर्ते राज्यभरातून सभास्थळी जमा होतात. मात्र राज ठाकरे यांच्या सभेवर आणि भाषणावर बंदी घालावी अशी मागणी भीम आर्मीने महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र लिहून केली आहे.
राज ठाकरे दरवेळी आपल्या भाषणातून दलित, मुस्लीम आणि संविधान विरोधी भूमिका घेत असतात. ते आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना असंविधानिक कृत्य करण्यास सांगतात. त्यामुळेच गुडीपाडवानिमित्त राज ठाकरे यांची शिवाजी पार्कात होणाऱ्या सभेला परवानगी देऊ नये. जर परवानगी दिली असेल तर ती तत्काळ रद्द करावी., असं पत्र भीम आर्मीने पोलीस महासंचालकांना दिलं आहे.
भीम आर्मीने पत्रात काय म्हटलंय?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राज ठाकरे हे आपल्या पत्रकार परिषदेत, आपल्या भाषणात प्रत्येक वेळी दलित, मुस्लिम आणि संविधान विरोधी भूमिका घेत असतात. ते नेहमी आपल्या भाषणातून त्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना असंविधानिक कृत्य करायला सांगतात हे देशासाठी, महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण मानवतेसाठी घातक आहे.
इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक होत आहे. तसेच दादर रेल्वे स्टेशनला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी देशभरात आंदोलन सुरु आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराला ही राज ठाकरे यांनी विरोध केला आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
भारतीय संविधानानुसार देशात सर्वधर्मीय नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत. परंतु राज ठाकरे यांच्या असंविधानिक, धार्मिक आणि जातीवादी भाषणामुळे नेहमी हिंदू-मुस्लिम समाजात दंगली घडवण्याचे काम, प्रयत्न केला गेला आहे.
त्यामुळे आपण आमच्या पत्राची तात्काळ दखल घेऊन गुडीपाडवा निमित्त 22/03/2022 तारखेला राज ठाकरे यांची शिवाजी पार्क मैदान दादर पश्चिम येथे सभा आहे. या सभेस आपण परवानगी देऊ नये आणि जर परवानगी दिली असेल तर ती तत्काळ रद्द करावी.