1 March New Rules : 1 मार्चपासून बदलणार हे नियम; आता तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम!
मुंबई : फेब्रुवारी महिना संपायला दोन दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. यानंतर मार्च महिना येणार आहे आणि प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला सरकारकडून काही नियम बदलले जातात, त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होतो. यावेळी देखील 2000 रुपयांची नोट, एलपीजीची किंमत आणि ट्रेनच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल होणार आहेत. आज आपण याच बदलांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
▶ 2000 रुपयांची नोट
1 मार्चपासून ग्राहकांना इंडियन बँकेच्या एटीएममधून 2,000रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत. यासाठी ग्राहकांना बँकेच्या शाखेत जावे लागेल. या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना बँकेने सांगितले की, एटीएममधून 2000 रुपयांची नोट काढल्यानंतर ग्राहक शाखेत येतात आणि त्याचे सुट्टे घेतात. हे थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
▶ एलपीजी किंमत
एलपीजीच्या किंमतीमध्ये महिन्याच्या सुरुवातीला तेल वितरण कंपन्या बदल करतात. मात्र, गेल्या वेळी यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. सध्या, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत दिल्लीत 1053 रुपये, कोलकात्यात 1079 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये आहे. मात्र यंदा या किंमती बदलू शकतात असा अंदाज आहे.
▶ बँका कर्ज महाग करणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतेच रेपो रेट वाढवले आहेत. त्यामुळेच आता बँका एमसीएलआर दरांमध्ये वाढ करणार आहेत. याचा थेट परिणाम कर्ज घेणाऱ्यांबरोबरच ईएमआयवर पडणार आहे. कर्जाचे व्याजदर वाढणार आहेत. तसेच ईएमआयचा भारही अधिक वाढणार असून याचा कर्ज घेणाऱ्यांना खिसा अधिक हलका होण्याची शक्यता आहे.
▶ अनेक विशेष गाड्या सुरू
मार्चमध्ये होळीचा सण उत्साहात साजरा केला जाणार आहे. हे लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने 1 मार्चपासून अनेक विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महानगरांमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या घरी जाण्याची खूप सोय होणार आहे. रेल्वेने विविध मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या दिल्ली, मध्य प्रदेश, मुंबईसह अनेक मार्गांदरम्यान धावतील. यामध्ये काही गाड्या सुरू झाल्या आहेत. त्याच वेळी, काही गाड्या 1 मार्च 2023 पासून सुरू होतील.
▶उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये बदल होणार आहे. मार्च महिन्यामध्ये ट्रेनच्या बदलेल्या वेळापत्रकाची घोषणा होऊ शकते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार 1 मार्चपासून हजारो पॅसेंजर ट्रेन आणि 5 हजार मलागाड्यांचं टाइम टेबल बदलणार आहे.
▶ सोशल मीडियासंदर्भातील बदल
सर्वसामान्यांसाठी सर्वात महत्त्वाचा म्हणजेच सोशल मीडियासंदर्भातील नियमही मार्च महिन्यात बदलू शकतात. यामध्ये इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्वीटवर लगाम लावला जाण्याची शक्यता आहे. धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट करण्यासंदर्भातील नियम लागू होणार आहेत. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या युझर्सकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारला जाणार आहे.
▶ बँक हॉलिडे
होळी, नवरात्री असे अनेक मोठे सण मार्च महिन्यात येतात. त्यामुळे मार्चमध्ये 12 दिवस बँका बंद राहतील. अशा परिस्थितीत, जर तुम्ही बँकेशी संबंधित कोणतेही काम बऱ्याच काळापासून पुढे ढकलत असाल तर ते त्वरित पूर्ण करुन घ्या.