महालोकवाणी न्यूज ;
अहमदनगर शहरात शिंदे गटाच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डीले आणि शिंदे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांचा मुलगा ओंकार सातपुते यांच्या एका लग्नात झालेल्या वादाचे रुपांतर थेट दगडफेकीत झाले आहे.
भाजपचे(BJP) नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डीले आणि शिंदे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांचा मुलगा ओंकार सातपुते यांचा एका लग्नात वाद झाला होता. या वाद विकोपाला गेल्याने मंगळवारी रात्री भाजपच्या कार्यकर्त्यांनी सातपुते यांच्या केडगामधील हॉटेलची तोडफोड केली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या दगडफेकीमुळे अहमदनगर (Ahmednagar) -पुणे (Pune) महामार्गावर बराच वेळ तणावाची परिस्थिती होती. कर्डीले समर्थकांनी सातपुते यांच्या रंगोली हॉटेलवर दगडफेक केल्यानंतर सातपुतेंच्या समर्थकांनी देखील त्यांना प्रत्युत्तर देत दगडफेक केली. त्यामुळे काही काळ नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्यात अक्षय कर्डीले यांच्यासह 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ओंकार सातपुते यांच्यासह इतरांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
