महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात धमक्यांचं सत्र सुरुच आहे. भाजपचे नेते नितीन गडकरी यांना कारागृहातून धमकीचा फोन आला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनाही धमकीचा फोन आला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी आली आहे. त्यांना उडवून टाकण्याची धमकी देणार फोन मुंबई पोलिसांना आला आहे. यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. पोलिसांनी लागलीच फोन कोठून आला, त्याचा शोध घेतला. त्यावेळी हा फोन पुणे शहरातून आल्याचे स्पष्ट झाले आहे.

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकण्याची धमकी देणारा फोन आला आहे. हा फोन मुंबई पोलिसांच्या ११२ क्रमांकावर आला आहे. फोन करणाऱ्याने फक्त मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकणार असल्याचे म्हणत फोन कट केला.
पोलीस यंत्रणा अलर्ट
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचा फोन आल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. पोलिसांनी त्वरीत फोन कोठून आला, त्याचा शोध घेतला. यावेळी फोन पुणे येथील वारजे येथून आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलिसांना त्वरित तपास करण्याचे आदेश दिले.

अंबानी, अमिताभ बच्चन यांनाही धमकी
निनावी फोन करुन धमक्या देण्याचे सत्र वाढले आहे. राजकीय नेते, उद्योपती यांचा नावांचा वापर करत धमक्या दिल्या जात आहेत. यापूर्वी नागपूर पोलिसांना प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, बिग बी अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचे बंगले बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्याचा फोन आला होता. अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांचा अँटालिया बंगला उडवून देण्याची धमकी दिली आहे. तसेच अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचे बंगलेही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. हा धमकीचा फोन आल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली होती. यामुळे निनावी फोन पोलिसांसाठी डोकेदुखी ठरले आहे.
