खासदार नीलेश लंके Nilesh lanke आणि सुजय विखे यांच्या समर्थकांमध्ये पारनेर बसस्थानकावर चांगलीच धुमचक्री झाली. यात लंके यांचे निष्ठावान कार्यकर्ते राहुल झावरे गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय या धुमचक्रीत ,लंके आणि विखे असे दोन्ही गटातील डझनभर कार्यकर्ते जखमी झाले आहेत. पारनेर बसस्थानकावर भर दुपारी ही धुमचक्री झाल्याने पळापळ झाली. पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरूवात केली आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नीलेश लंके आणि भाजपचे (BJP) सुजय विखे यांच्यात अटीतटीची लढाई झाली. यात नीलेश लंके खासदार झाले. लोकसभेसाठी विखे यांनी लंके यांच्या होमग्राऊंडवर बरीच फोडाफोडी केली. लंकेंच्या जवळचे कार्यकर्ते फोडून विखेंनी बरोबर घेतले. माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी यात विखेंची साथ केली. विजय औटी यांच्याबरोबर असलेले त्यांचे कार्यकर्ते लंके यांच्या विजयानंतर काहीसे तणावातच आहे. मात्र लंके यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यातूनच ही पारनेरमधील बसस्थानकावर विखे आणि लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धमुचक्री झाली.
राहुल झावरे आणि विजय औटी हे आपआपल्या कार्यकर्त्यांबरोबर समोरसमोर येऊन ही धुमचक्री झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यात गाड्यांचे फोडाफोडी झाली. दोन्ही गट भिडल्याने कोण, कोणाला मारत होत हेच कळत नव्हते. यात नीलेश लंके यांचा पीए राहुल झावरे गंभीर जखमी झाले. हा राडा एवढा वाढला की, बसस्थानकावर पळापळी झाली. त्यामुळे काही क्षणात बसस्थानक परिसरातील व्यवसायिकांनी दुकाने बंद करून घेतली.
राहुल झावरे गंभीर जखमी झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय डझनभर कार्यकर्ते या धुमचक्रीत जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पारनेर पोलिसांना या धुमचक्रीची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पारनेर बसस्थानकासह काही संवेदनशील भागात पारनेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. तसेच पारनेर पोलिसांनी या धुमचक्रीत सहभागी असलेल्याची नावे काढली असून, त्यानुसार धरपकड सुरू केली आहे. या धुमचक्रीवरून पारनेरमध्ये विखे आणि लंके यांच्यातील राजकीय संघर्ष वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
पुढील उपचारााठी राहुल झावरे यांना अहमदनगर येथील सुरभी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
