
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.याप्रकरणी अज्ञात आरोपीं विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसर परिसरात आमदार रोहित पवार यांचं सृजन हाऊस या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय आहे.त्यांच्या या कार्यालयात शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करत जाळपोळ केली असल्याचे समोर आले आहे. रोहित पवार कर्जत- जामखेडचे आमदार आहेत. घडलेल्या प्रकारानंतर रोहित पवार यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

हडपसर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
आमदार रोहित पवारांच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये असलेली एक सायकल आणि कार्यालयाची काही प्रमाणात जाळपोळ देखील झाली. सायकलला ऑइल पेंटच्या साह्याने आग लावण्यात आली आहे. शेजारीच असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरात तीन व्यक्ती येताना दिसत आहेत. या व्यक्ती कोण आहे त्यांचा नेमका हेतू काय आणि त्यांनी कशामुळे आग लावण्याचा प्रयत्न केला याची उत्तरे सध्या तरी अनुत्तरित आहेत. हडपसर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
