वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी वाचनाची आवड शालेय वयात निर्माण होणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हायची असेल तर तशी परिस्थिती त्यांच्याभोवती निर्माण होणे गरजेचे आहे,ही गरज ओळखून मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र उपकेसरी श्री.बबन काका काशिद व मित्रमंडळ पुणे,यांनी जि.प.प्रा.सारोळा शाळेच्या वाचनालयास गोष्टीची पुस्तके भेट दिली.
या वेळी श्री.बबन काका काशिद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या आधुनिक युगात मोबाईल, सोशल मीडियामुळे एकमेकांतील संवाद संपत चाललेला आहे. मोबाईलच्या अतिवापराचे परिणाम मुलांच्या आरोग्यावर दिसून येत आहेत.विद्यार्थ्यांमध्ये चिडचिडेपणा,मुले एकलकोंडी होताना दिसत आहेत.त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासावी असे सांगितले तसेच विद्यार्थ्यांना वाचनाचे फायदे,वाचनाची आवड जोपासण्यासाठी काय करावे,याविषयी मार्गदर्शन केले.तसेच शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला.
मुलांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी. त्यासाठी घरातही वाचनाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.या वेळी शाळेतील सर्व शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक करून मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन या संस्थेचे व मित्रमंडळ पुणे यांचे आभार व्यक्त करत या पुस्तकांचा विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी उपयोग होईल असे सांगितले.या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर सातपुते,मुख्याध्यापक शहाजी जगताप,माजिद शेख,खंडेराव सोळंके, प्रशांत होळकर,शबाना शेख, अमृता रसाळ,शितल कदम, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
