IND vs NZ, 2nd T20I : भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर भारताने न्यूझीलंडला ९९ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांचीही कोंडी झाली होती. न्यूझीलंडने १०० धावांच्या लक्ष्यासाठी भारताला अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष करण्यास भाग पाडले होते.
भारतीय गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करताना न्यूझीलंडच्या धावगतीवर वेसण घातले. युझवेंद्र चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा निर्णय योग्य ठरला. युझवेंद्र चहलने आज भारताकडून ट्वेंटी-२०त सर्वाधिक ९१ विकेट्स घेत भुवनेश्वर कुमारचा ( ९०) विक्रम मोडला.
युझवेंद्र, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हार्दिक पांड्या व दीपक हुडा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अर्शदीप सिंगने दोन विकेट्स घेतल्या. न्यूझींलडचा कर्णधार मिचेल सँटनरने सर्वाधिक १९*धावा केल्या. तर भारताकडून सूर्याने २६ आणि हार्दिकने १५ धावांवर नाबाद राहत हा रोमहर्षक सामना जिंकला.
