भारतीय संघाने पहिला वहिला १९ वर्षांखालील मुलींचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अन् नंतर फलंदाजीत कमाल करून दाखवली. इंग्लंडचा संपूर्ण संघ ६८ धावांत गुंडाळून भारतीय मुलींनी जेतेपदाच्या दिशेने मोठी झेप घेतलीच होती. त्यानंतर फलंदाजांनी त्यांची भूमिका पार पाडली. श्वेताने या स्पर्धेत सर्वाधिक २९७ धावा केल्या आहेत आणि नाबाद ९२ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. शेफालीनेही ७ सामन्यांत १७२ धावा केल्या. गोलंदाजीत पार्श्वी चोप्राने भारताकडून सर्वाधिक ११ विकेट्स घेतल्या आहेत.
शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या १९ वर्षांखालील मुलींनी वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. गोलंदाजी, क्षेत्ररक्षणात चमकदार खेळ करताना भारताच्या पोरींनी इंग्लंडची घसरगुंडी उडवली. तितास संधू, अर्चना देवी व पार्श्वी चोप्रा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत इंग्लंडच्या मुलींच्या संघाची वाईट अवस्था केली. इंग्लंडचा संघ ६८ धावांत तंबूत परतला.
ICC स्पर्धेच्या फायनलमधील सर्वबाद ६८ ही सर्वात निचांक खेळी ठरली. यापूर्वी २००६मध्ये १९ वर्षांखालील मुलांच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पाकिस्तानने ७१ धावांवर भारताचा डाव गुंडाळला होता. दरम्यान भारताने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकून इतिहास घडवला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता आणि आज शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील पोरींनी तसाच पराक्रम केला.
