महालोकवाणी न्यूज:- दिनांक 2 फेब्रुवारी 2023
अवघ्या राज्याचे लक्ष्य खिळवून ठेवणार्या नाशिक पदवीधर मतदार संघातील मतमोजणीतून अपेक्षीत परिणाम समोर आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत चर्चेच्या केंद्रस्थानी राहीलेल्या अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी विजयात रुपांतरीत केली आहे. त्यांचा हा विजय डॉ.सुधीर तांबे यांच्या कार्य कर्तृत्वाची झलक दाखवणारा ठरला आहे. आपल्याच पक्षा विरोधात निवडणुकीला सामोरे जात, दुसर्या बलाढ्य पक्षाला शांत बसवण्याची किमया साधून सत्यजीत तांबे यांनी मिळवलेला हा विजय ‘ऐतिहासिक’ ठरला आहे. त्यांच्या विजयाने नाशिक पदवीधर मतदार संघातील ‘तांबे’ नावाचा दबदबाही पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार चौथ्या फेरीच्या मोजणी दरम्यान सत्यजित तांबे यांनी पहिल्या पसंतीच्या 60 हजार मतांचा कोटा पूर्ण केला आहे, त्यामुळे प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच त्यांना विजयी घोषित केले जाईल.

नानाविध घडामोडी घडलेल्या आणि सरतेशेवटी माध्यमं, विश्लेषक, जाणकार आणि खुद्द राजकीय नेत्यांनाही कोलांटी देणार्या नाशिक पदवीधर मतदार संघातील सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करुन काँग्रेसची विचारधारा सोबत असल्याचे जाहीर केले. त्यांचा हा निर्णय बहुतेकांच्या अंदाजावर पाणी सोडणारा ठरल्यानंतर चक्क माघारीच्या दिवशी भाजपाकडून संभाव्य उमेदवार समजल्या जाणार्या धुळ्याच्या धनराज विसपूते यांच्यासह नगरच्या धनंजय जाधव यांची माघार झाली. ही घटना वरील सर्व घटकांना बुचकाळ्यात टाकणारी होती. सत्यजीत तांबे यांना भाजपाची उमेदवारी जाहीर होईल हा अंदाज फोल ठरल्यानंतर ते भाजपाचा पाठींबा मिळवून वरीष्ठ सभागृहात पोहोचतील असेही अंदाज वर्तविले गेले.
उशीरा याल तर परीक्षेला मुकाल; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने दिले आदेश !
मात्र अगदी निवडणुकीच्या दिवसापर्यंत त्यांनी अथवा डॉ.सुधीर तांबे यांनी भाजपाकडून पाठींबा मागितला नाही. या दरम्यान नाशिक जिल्ह्यातील निफाड, लासलगाव व येवला भागातील प्रचारादरम्यान त्यांनी काँग्रेसचे विचार आपल्या रक्तात भिनले असल्याचेही भाष्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुनही राजकीय भाष्यकारांचा गोंधळ उडाला होता.

ऐन मतदानाच्या दिवशी फडणवीस काहीतरी खेळी करतील असेही राजकीय वर्तुळातून बोलले गेले, मात्र ते देखील हवेतच विरले. त्याचवेळी मतदानाच्या पूर्वसंध्येला डॉ.सुधीर तांबे यांनी मतदारांनी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून सत्यजीत तांबे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्याचा परिणाम पाचही जिल्ह्यातील मतदारांवर झाल्याचे हाती येत असलेल्या आकड्यांवरुन स्पष्ट होत आहे

सत्यजीत तांबे या उमद्या तरुण नेतृत्त्वाने गेली 22 वर्ष राजकीय संघर्ष केला आहे. अगदी काँग्रेसच्या तालुका कार्यकारणीपासून कामाची सुरुवात करीत त्यांनी पक्षीय रचनेत राज्यात सर्वोच्च असलेल्या युवक प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत मजल मारली. या दरम्यान देशासह राज्यातून कोलमडणार्या काँग्रेसला बळ देण्यासाठी त्यांनी आपले मामा बाळासाहेब थोरात यांच्यासोबत भाजपासारख्या बलाढ्य राजकीय शत्रूचा हल्ला दोन्ही आघाड्यांवर थोपवून धरला. दोन दशकांहून अधिक काळ केवळ संघटनात्मक जबाबदार्या पेलणार्या सत्यजीत तांबे यांची एकप्रकारे पक्षाने प्रतारणाच केली.
हे ही वाचा- कोणे होते पहिले भारतीय गव्हर्नर, जे Finance Minister ही होते? २ भाषेत छापली होती बजेटची प्रत..
सत्यजित तांबेना एकूण 68990 मताधिक्य मिळाले अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या विजयाचे वृत्त धडकताच पाचही जिल्ह्यात जागोजागी त्यांच्या समर्थकांनी जल्लोश सुरु केला. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, ढोलबाजे, लाऊडस्पिकर यांचा वापर करुन मनसोक्त नाचणारे कार्यकर्तेही दिसून आले. या निवडणुकीत काँग्रेससह राष्ट्रवादीनेही आपल्या विजयासाठी प्रयत्न केले नसल्याचा आरोप दुपारीच मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी केला आहे. त्यावरुन राज्यात पुन्हा एकदा आघाडीत बेबनाव होण्याची स्थितीही नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निकालावरुन निर्माण झाली आहे. तूर्त सत्यजीत तांबे यांनी मिळविलेला विजय त्यांचे समर्थक जल्लोशाने साजरा करीत आहेत.
