अहमदनगर शहर प्रतिनिधी: विजय मते
नगर – प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या शाळेबद्दल प्रेम, आपुलकी व शिक्षकांविषयी आदराची भावना ठेवावी. शाळेने तुम्हाला दिलेला आत्मविश्वास भविष्यात यशाच्या शिखरावर नेत असतो. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून तुमच्या कला-गुणांना वाव मिळतो. त्यामधून आपली संस्कृती जोपासावी, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.
सावेडी उपनगरातील निर्मलनगर येथील सौ.लक्ष्मीबाई शांतराम डोके विद्या मंदिर व साई माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन दिपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे नगरसेवक सुनिल त्र्यंबके, तोफखाना पोलिस स्टेशनचे सावळेराम क्षीरसागर, पोलिस नाईक श्री.शेख, श्री.भोसले, मुख्याध्यापिका रिबेका क्षेत्रे, मंदाकिनी पांडूळे, आशा धामणे, सुजाता कर्डिले, ज्योती पवार, मंजू नवगिरे, संजोग बर्वे, संभाजी पवार आदि उपस्थित होते.

श्री.त्र्यंबके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले, जीवनात यश मिळविण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही. कठोर परिश्रम हाच पर्याय उपलब्ध असतो. अभ्यासाशिवाय तुम्ही ध्येय गाठू शकत नाही. तेव्हा चांगला अभ्यास करा. यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.
प्रमुख पाहुणे सावळेराम क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, मार्काचा विचार न करता ज्ञान आत्मसात करा. शिक्षक हे आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार आहेत. संस्कारची शिदोरी व ज्ञानदानाचे काम शिक्षक करतात. आई, वडिल व शिक्षक यांचा आदर करत जा. क्षेत्र निवडा, ध्येय निश्चित करा आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा यशाचे शिखर गाठता पेईल.
प्रास्तविकात मुख्याध्यापिका रिबेका क्षेत्रे यांनी डोके विद्या मंदिर वार्षिक शैक्षणिक अहवाल वाचन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचा आलेख दरवर्षी वाढत असून, शैक्षणिक प्रगतीसाठी डोके परिवारासह पालकांचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, सांस्कृतिक कला-गुणांचे दर्शन उपस्थितांना आपल्या कलेतून दाखविले. त्यांना सर्वांनी दाद दिली. सूत्रसंचालन मंदाकिनी पांडूळे यांनी केले तर आभार आशा धामणे यांनी मानले.
