अहमदनगर ता 22 – निघोज (पारनेर) चे तत्कालीन सरपंच संदिप वराळ यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी प्रवीण रसाळ याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अटी- शर्तीवर जामिन मंजूर केला. जस्टीस एस. जी. मेहरे यांनी याबाबतचे आदेश दिले. दोन लाख रुपयांच्या व्यक्तीगत जामिनासह त्याला जामिन मंजूर करण्यात आला असला तरी रसाळ याला जिल्हा बंदीची अट घालण्यात आली असून प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला त्याला पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.
संदीप वराळ यांचे हत्याकांड संपूर्ण राज्यात गाजले होते. संदीप वराळ यांची हत्या भरदिवसा चौकात करण्यात आली होती. सदरच्या घटनेशी आपला कोणताही संबंध नसल्याचा कांगावा त्यावेळी प्रवीण रसाळ याने केला होता. मात्र, पोलिसांना त्याच्याबाबतचे भक्कम पुरावे सापडले होते. पोलिसांच्या शोधकार्यात प्रवीण रसाळ याला अटक करण्यात आली होती.यातील काही सहभागी आरोपींना या आधीच जामीन मिळाले होते.
जामिन मिळावा यासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज केला होता. रसाळ याच्या वतीने ऍड. नितीन शेजपाल, ऍड. सरिता साबळे, ऍड. बंटी कावरे यांनी कामकाज पाहिले.
