Nashik Onion : नाशिक बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी मागील सहा दिवसांपासून कांदा खरेदी बंद केलेली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत तोडगा काढणार असल्याचं म्हटलं आहे. मंगळवारी रात्री केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत मुंबईत एक महत्त्वाची बैठक संपन्न होत असल्याचं पवारांनी सांगितलं.
Rohit Pawar | रोहित पवार ‘भावी मुख्यमंत्री’; पुण्यानंतर आता जामखेड शहरामध्येही झळकले पवारांचे बॅनर..
नाफेडने खरेदी केलेला कांदा कमी दरामध्ये काही व्यापारी इतर राज्यातील व्यापाऱ्यांना विक्री करतात, त्यामुळे कांद्याचे दर घसरले आहेत; असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. शिवाय बाजार समित्यांमध्ये लादलेले खरेदी शुल्क रद्द करुन बाजार फीस एक टक्क्यांवरुन अर्धा टक्का करावी, या व्यापाऱ्यांच्या मागण्या आहेत.
कांदा व्यापाऱ्यांनी संप पुकारला
दिनांक १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी निमित्त सुटी असल्याने बाजारसमितीतील कांदा व्यवहार बंद होते. ठराविक ठिकाणीच या दिवशी व्यवहार झालेत. मात्र त्यानंतर बुधवार दिनांक २० सप्टेंबरपासून कांदा व्यापाऱ्यांनी संप पुकारल्याने कांदा खरेदी बंद राहिली. परिणामी सणासुदीला कांदा विकून चार पैसे हातात येतील ही शेतकऱ्याची अपेक्षा फोल ठरली. दुसरीकडे नाफेडची कांदा खरेदीही अपेक्षित पद्धतीने होत नसून जास्तीचे निकष लावल्याने आणि कमी भाव देत असल्याने शेतकऱ्यांनी तिकडे पाठ फिरवली.

अजित पवार म्हणाले..
व्यापाऱ्यांनी २० सप्टेंबरपासून कांदा खरेदी बंद केलीय. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत आज (मंगळवारी) रात्री सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. या बैठकीसाठी राज्याचे कृषीमंत्री, पणनमंत्री, व्यापारी, पाच मार्केट कमिटीचे चेअरमन, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कांदा खरेदीबाबत निर्णय
शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या विचार करुन कांदा खरेदीबाबत निर्णय घेतला जाईल. जीएसटीसंदर्भातही चर्चा होईल, असं अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यामुळे उद्यापासून नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी सुरु होऊ शकते. बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं, यावर व्यापारी निर्णय घेऊ शकतात.
