जामखेड प्रतिनिधी : Maratha Reservation | पुन्हा एकदा जामखेड शहरातील खर्डा चौक येथे मराठा आंदोलकांचा आवाज घुमला आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’च्या घोषणांनी मराठा आंदोलकांनी संपूर्ण खर्डा चौक परिसर आज दणाणून सोडला.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जालना जिल्ह्यातील सराटी येथील साखळी उपोषणाच्या समर्थनार्थ जामखेड येथे मराठा क्रांती मोर्चा महिला विभाग च्या वतीने जामखेड शहरातील खर्डा चौक येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी माहिलांची भाषणे झाली असून भाषणातून सरकार विरोधात निषेध व्यक्त केला.
रास्तारोको आंदोलन प्रसंगी शेवटी संविधान उद्देशीकेचे वाचन करुन राष्ट्रगीत व शिवरायांच्या ध्येयमंत्र म्हणून सांगता करण्यात आली. यावेळी रिपब्लीकन पार्टी, जामखेड तसेच अखिल भारतीय कासार समाज शाखा जामखेड च्या माहिलाअघाडी च्यावतीने पाठींबा देण्यात आला.

एका रात्रीत मंत्री बदलतात मग मराठा आरक्षणाचे घोडं कुठे आडतंय. – सौ.रोहिणी संजय काशिद
🔳 प्रतिक्रिया
आमच्या मुलांच्या न्याय हक्कासाठी आज चा रास्तारोको करण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) द्यायला अजून कितीवेळ लागणार माहित नाही पण सरकार ने तात्काळ त्यांना आरक्षण द्यावे.मराठा आरक्षण मिळालं तर मराठ्यांना, त्यांच्या लेकरांना किंवा पुढच्या पिढीला मोठा फायदा होईल. ग्रामीण भागातील मराठा समाजाला आजही अनेक समस्याना तोंड द्यावं लागतं आहे, एका रात्रीत सरकार बदलते ,एका रात्रीत मंत्री बदलतात मग मराठा आरक्षणाचे घोडं कुठे आडतंय.आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत.
