येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये (Yerawada Jail) तीन कैद्यांचा मृत्यु झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तीन कैद्यांचा मृत्यू वेगवेगळ्या आजरामुळे झाला आहे. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी एका कैद्याचे कुटुंबीय त्याला भेटण्यासाठी कारागृहात गेले त्यावेळी त्यांना मुलाचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले.
शाहरुख बाबू शेख (वय-29 रा. कोंढवा), संदेश अनिल गोंडेकर (वय-26 रा. डोणजे, हवेली), रंगनाथ चंद्रशेखर दाताळ (वय-32 रा. मोरगाव, बारामती) असे मृत्यू झालेल्या कैद्यांची नावे आहेत. संदेश गोंडेकर याच्यावर 2018 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला असून तेव्हापासून तो येरवडा कारागृहात आहे. त्याचे आई-वडील त्याला भेटण्यासाठी नियमीतपणे जात होते. 31 डिसेंबरला त्याचे वडील त्याला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना मुलाचा मृत्यु झाल्याची माहिती देण्यात आली.
यानंतर संदेश याच्या वडिलांनी मुलाच्या मृत्यूप्रकरणी कारागृह प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत आक्षेप नोंदवला. यानंतर येरवडा कारागृहातील अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यु ‘लिव्हर सोरायसिस’ या आजाराने झाल्याचे स्पष्ट केले.
